काव्य-सरिता

काव्य-सरिता

डॉ. निशिकांत श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

 

जीवन ही एक सरिता आहे – अखंड स्रोताची सरिता!

या सरितेचा स्रोत कालाचा नाही; हे रूपक केवळ वाहत्या काळापुरते मर्यादित नाही तर ते जीवनातील प्रत्येक अंगाशी निगडीत आहे. आपण जगत असलेला प्रत्येक क्षण मागे निघून जात असतो हे तर सत्यच; तथापि त्या क्षणी आपण जगलेले जीवन मात्र आपला शाश्वत परिणाम आणि ठसा घेऊनच आपल्याबरोबर आपल्या जीवनाचा प्रवास करीत असते. त्या क्षणाच्या प्रसंगाच्या स्मृती, त्याच्याशी निगडित आपल्या भावना, त्याचा आपल्या जीवनावर आणि स्वभावावर झालेला परिणाम, सारे काही आपल्या ऊर्वरित आयुष्याचा एक अविभाज्य घटक बनलेले असते; सतत आपल्या जीवनाबरोबर पुढे चालत असते.

असे म्हणतात की काळ हे दुःखावरील परिणामकारक औषध आहे; काळासंगे दुःख नाहीसे होते. खोटे आहे हे! आपण आयुष्यात जे दुःख म्हणून भोगले ते कायम दुःख म्हणूनच आपल्या समवेत येत असते. दुःखाची ती भावना, ते सल आपल्या हृदयातून कधीच नष्ट होत नाहीत. बदल घडतो तो फक्त आपल्या भावप्रदर्शनात! कालांतराने मनुष्य त्या दुःखावर सतत अश्रू घालायाचे थांबवेल; मात्र त्याच्या मनाच्या कोपऱ्यातते दुःख तेवढ्याच तीव्रतेने वसलेले असते शाश्वतपणे. त्याची आठवण येताच मनुष्य तितक्याच तीव्रतेने – केवळ अंतर्यामी का होईना – कासावीस होतोच.

हा विचार केवळ दुःखाशीच निगडित नाही; येथे दुःख केवळ एक उदाहरण म्हणून वापरले आहे. एकदा अनुभवलेली किंवा जगलेली भावना मनुष्य जीवनभर सदैव जगत असतो.

जसजसे वय वाढत जाते तसतशी प्रसंगात भर पडत जाते आणि या सगळ्या प्रसंगांच्या भावनांच्या विविध छटांनी त्याचे जीवन बनते. यालाच आपण त्याचे व्यक्तिमत्व म्हणतो.

हे जर सत्य आहे तर ज्या भावना आपण जगलो त्या प्रामाणिकपणे स्वतःच्या मनाशी कबूल करणे हा त्या कोंडीतून बाहेर पडण्याचा, किंबहुना ती कोंडी सुसह्य करण्याचा जसा एक सुलभ मार्ग आहे तसाच तो आयुष्यात पुढे येणाऱ्या प्रसंगांना समर्थपणे सामोरे जाण्याचा एक सामर्थ्यवान मार्गदर्शकही!

 कित्येक वर्षांपूर्वी ‘साहित्यसूची’त लिहिलेल्या एका लेखात मी मला पटणारी काव्याची व्याख्या नमूद केली होती; तिचा पुनरुच्चार या ठिकाणी निश्चितच औचित्यपूर्ण ठरावा ......

‘...... भावनांचा विस्फोट हेच काव्य ......’

त्यामुळे जीवनात जगलेल्या सर्व प्रसंगांच्या भावनांच्या बेमालूम मिश्रणाने माणसाचे जे व्यक्तिमत्व घडते ते त्याच्या जीवनाचे काव्यच नव्हे काय!

भावनांचा विस्फोट हा केवळ बाह्यदर्शनीच असावा किंवा तो इतरांसमोरच असावा असे थोडेच आहे! एकांतातील किंवा अंतर्मनातील विस्फोट हे देखील त्याचे काव्यच असते.

काव्याला विशिष्ठ माध्यमाचे कुंपण घालायला मी तरी तयार नाही. ललित साहित्यात आपण ज्याला काव्य म्हणतो तो  काव्याचा एक प्रकार झाला. तथापि आपल्याच भावविश्वात हरवून सुरांनी साकारलेलेही जसे काव्यच तसे कुंचल्यांनी साकारलेले देखील काव्यच! इतकेच काय पण प्रियकराने आपल्या प्रेयसीला व्यक्त केलेल्या प्रेमभावना किंवा मातेने आपल्या बालकाकडे पाहून व्यक्त केलेल्या वात्सल्यभावना ही सर्व निःशब्द काव्येच आहेत. आपल्या लेकराला स्तनपान देतांना माता जे जगते ते तर सर्वश्रेष्ठ काव्यच होय! हे विचार, या भावना  मी माझ्या ‘कुंचले घेऊन हाती’ या कादंबरीत अधिक विस्तृतपणे मांडल्या आहेत, स्पष्ट केल्या आहेत.

म्हणूनच भावना वैयक्तिक असते हे माझ्यामते केवळ अर्धसत्य आहे. उद्भवणारी भावना जरी व्यक्तीनुसार बदलत असली तरी त्यासाठी दुसऱ्याचा सहभागही तितकाच महत्वाचा असतो. म्हणूनच काव्य जरी व्यक्तीसापेक्ष असले तरी ते केवळ व्यक्तिगत किंवा व्यक्तिनिष्ठ नसते ही जाण प्रत्येकांनी ठेवली तर द्वापारयुगात भगवान श्रीकृष्णांपासून कलियुगातील  सत्यसाईबाबांपर्यंत सर्व धर्मातील अनेक तत्ववेत्त्यांनी जे सांगण्याचा प्रयत्न केला ते सहज साध्य होईल. या विचाराने माणसामाणसातील दरी नष्ट होऊन एकत्वाच्या भावनेने अखिल मनुष्यजातच काय पण समस्त जीवसृष्टी आपुलकीने आणि एकोप्याने या पृथ्वीतलावर गुण्यागोविंदाने राहू लागतील.

वास्तविक हाच फार मोठा संदेश काव्य देते; हीच अनमोल शिकवण देते. आपल्या मनात ज्या कारणामुळे  भावना उद्भवल्या त्या कारणाने इतरांच्याही मनात काही भावना उद्भवल्या असतील; इतकेच नव्हे तर त्या भावना आपल्या मनातील भावनेपेक्षा भिन्न असू शकतील हे आपल्याला काव्य शिकवते. काव्यासारखे प्रभावी मध्यम जसे आपल्या भावना दुसऱ्याच्या अंतर्यामी परिणामकारकतेने उतरविण्याला उपयुक्त ठरते तसेच ते इतरांच्या भावना जाणून घेण्यासाठी देखील उपयुक्त ठरते. थोडक्यात काव्य हे माणसामध्ये समानुभूतीचे (Empathy) कौशल्य विकसित करते. शिवाय यामुळे मनुष्याची आत्मकेंद्रित वृत्ती नाहीशी होऊन तो अधिकाधिक समाजाभिमुख बनतो.

याची प्रचीती आपल्याला रे. ना. व. टिळक यांची ‘केव्हढे हे क्रौर्य’ ही कविता वाचतांना शब्दा-शब्दागणिक जशी येते तशीच ती स्वातंत्र्यवीर सावरकर यांची सागराला उद्देशून केलेली कविता वाचतांना देखील होते.

‘म्हणाल भुलली जगा, विसरली प्रिया लेकरा

म्हणोनि अतिसंकटे उडत पटले मी घरा

या चरणांमधून रे. टिळकांनी आसन्नमरण विद्ध पक्षिणीच्या भावनांचा घेतलेला वेध प्रत्येकाला – अगदी पुरुषांना देखील मातेच्या भावनांची प्रचिती देतो.

‘अबला न माझी ही माता रे

कथिल हे अगस्तिस आता रे

जो आचमनी एक क्षणी तुज प्याला’

हा स्वा. सावरकरांचा तेजस्वी तरीही व्याकुळ शब्दस्रोत अगतिक अवस्थेतील प्रत्येकाला चैतन्य देणाराच आहे. कितीही अगतिक झाला तरीही आपल्या जीवनातील काही गोष्टी, काही नाती, आपल्या व्यक्तिमत्वाचे काही पैलू ही प्रत्येकाची बलस्थाने असतात. आवश्यकता असते अशा निद्रिस्त बलस्थानांची जाण असण्याची  आणि त्यांना जगविण्याची हे किती सुंदर ‘वज्रादपि कठोराणि, मृदूनि कुसुमादपि’ अशा परिणामकारक शब्दांमधून सावरकरांनी व्यक्त केले आहे.

हे सामर्थ्य केवळ आत्मकेंद्रित वृत्तीने साध्य झालेच नसते. आत्मकेंद्रित वृत्तीचे हे मोहक कवच निष्ठुरपणे फोडून दयार्द्र दृष्टीने जगाकडे पहायला उद्युक्त करते काव्य!

स्वतःच्या भावनांच्या उद्रेकाने निर्माण होणारे काव्य असो वा स्वतःच्या भावनांचे प्रतिबिंब शोधणारे दुसऱ्याचे काव्य असो, त्यामुळे माणसाच्या मनाचा कोंडमाऱ्याचा निचरा होतो, त्याची एकलेपणाची भावना कमी होते आणि मग कवी अनिल आपल्या ‘आणिबाणी’ या दशपदीत म्हणतात त्याप्रमाणे,

‘कसे निभावून गेलो काही समजले नाही

जवळ तसे काहीच नव्हते, नुसते हातात हात होते’

याची प्रचीती त्याला जीवनातील आव्हान देणाऱ्या प्रत्येक वळणावर येते.

जीवन हेच मुळी एक आव्हान आहे आणि त्यात अशी वळणे पदोपदी येतच असतात; त्यातील कित्येकांना वळसा घालून जाणे आपल्या हातात नसते; तथापी त्यातील वळणे बरीचशी पार केल्यानंतर आपल्याला जाणवते की कदाचित वेगळ्या वागण्याने आपण या आव्हानांना टाळू शकलो असतो. पण ती तर पश्चातबुद्धी झाली; प्रसंग घडून गेल्यावर पुढे काय!

जीवनातील जे प्रसंग आनंददायी असतील ते तर आपण उपभोगतोच! – आपल्या आप्तेष्टमित्रांसह उपभोगतो; त्याला काव्याची साथ मिळाली तर अधिक रसपूर्णतेने उपभोगतो!

दुःखद प्रसंग मात्र मनुष्याला बहुतांशी गोंधळात टाकतात.ते त्याला केवळ दुःखीच करत नाहीत तर त्याचा बुद्धिभेद देखील करतात, त्याच्या आत्मविश्वासाला तडा देखील पोहोचवू शकतात. कोसळणारे दुःख अपरिमित असेल तर माणूस निराशेच्या खोल गर्तेत फेकला जातो.

परंतु मनुष्याच्या मनाची घडण जर काव्यासक्त असेल तर तो प्रत्येक भावनेत आणि अनुभवात सौंदर्यच शोधू लागतो.

सौंदर्य म्हणजे आहे तरी काय?

मनाला लोभावणारे, भुरळ घालणारे ते सौंदर्य!

माझ्या ‘कुंचले घेऊन हाती’ या कादंबरीत मी सौंदर्याचा सखोल उहापोह केला आहे. सौंदर्य हे बाह्याकारावर किंवा सौष्ठवावर ठरत नाही तर ते अंतर्यामी स्पर्श करणाऱ्या भावनांमुळे प्रतीत होते.

काव्यासक्त मन दुःखातूनही मनाला आकर्षित करणारे काही तरी शोधू लागते.  जे घडले ते कितीही वाईट असले तरी मनुष्य त्यातून चांगल्याचा शोध घेऊ लागतो; जीवनाकडे पहायचा त्याचा दृष्टीकोन नकारात्मक न राहता सकारात्मक होतो; कोसळलेल्या दुःखाने खचून न जाता त्याचे मन पुन्हा उभारी धरते आणि मग फीनिक्स पक्षासारखे निराशेच्या किंवा दुःखाच्या राखेतून पुनर्जीवन प्राप्त करून ते पुनरपि महत्वाकांक्षेच्या आभाळात झेप घेते!

माझ्या मते काव्याचा, काव्यमय मनाचा आणि काव्यात्मक जीवनाचा हा खूप मोठा लाभ आहे. काव्याने मानवी जीवनाला दिलेले हे सर्वात थोर वरदान आहे.  

मला वाटते कदाचित यामुळेच असेल, पण दुःखी काव्य अधिक सौंदर्याने भारलेले असावे! आपले दुःख मोकळे करतांना मनुष्य नेहमीच मन संपूर्णपणे मोकळे व्हायचा प्रयत्न करत असतो. मनाच्या त्या रितेपणात त्याला पुढच्या क्षणात थोडीतरी आशा, थोडा तरी आनंद, थोडेतरी सुख शोधायचे असते, वेचायचे असते. दुःख मोकळे करण्याच्या प्रक्रियेलाच मुळी काव्य सौंदर्याची झालर लावून सर्जनशील बनविते, कार्यप्रवण बनविते.

कवी मनाला जशी स्वतःच्या भावना इतरांपुढे उघड्या करण्याची आस असते तसेच त्याच्यात इतरांच्या भावना समजून घेण्याचे सामर्थ्य देखील असते. साहजिकच, त्यामुळे तत्वतः भावनांची कदर करणारा कवी सर्वांना हवाहवासा वाटत असतो – निदान असायला हवा.

अर्थात सध्या सर्वसामान्य माणसात ‘कवी’ या व्यक्तिमत्वाची फारच हेटाई होत आहे. परंतु माझ्या मते त्याला कवीचा अहंकार अधिक कारणीभूत असावा. इतरांच्यावर आपल्या काव्याची किंवा काव्यवाचन ऐकण्याची जबरदस्ती करण्याचा त्याचा अट्टाहास हा त्यासाठी कारणीभूत असावा. अशावेळी हा कवी दुसऱ्याच्या भावना जाणून घेण्याची आपल्या कवीमनाची अमोघ शक्ती विसरून जाऊन स्वतःच्या काव्यनिर्मितीचे कोडकौतुक करण्यापायी आपल्या अहंकारी मनाच्या आहारी गेलेला असतो. अशावेळी त्याची टिंगल झाली तर तो दोष काव्याचा किंवा कविमनाचा नाही तर तो त्या कवीच्या आत्मकेंद्रित वृत्तीचा आहे.

अरसिकेषु कवित्व निवेदनं

शिरसि मा लिख मा लिख मा लिख|

या (सु)भाषितात कवीची ही दर्पोक्ती निश्चितच जाणवते. तथापि खरा मनस्वी कवी या सुभाषितातून देखील दर्प बाजूला ठेवून त्यातून सकारात्मक अर्थच काढेल. अरसिकत्व हा अवगुण कोण्या व्यक्तीचा नसून तो त्याच्या मानसिक स्थितीला उद्देशून वापरलेला आहे. जर समोरील व्यक्तीची किंवा समुदायाची मानसिक स्थिती आपल्या भावना समजावून घेण्याची नसेल; किंवा आपल्या निर्मितीचा स्वाद घेण्याची नसेल तर अशा वेळी कवीला आपले काव्य ऐकविण्याचा, आपल्या भावना प्रकट करण्याचा  मोह टाळता आला पाहिजे. मनाच्या काव्यात्मक घडणीमुळे कवीला दुसऱ्याच्या भावना जाणून घेण्याचे दैवी सामर्थ्य प्राप्त झालेले असतांना देखील त्यांच्या मानसिक स्थितीकडे दुर्लक्ष करून आपले काव्य किंवा आपल्या भावना त्यांच्यावर लादणे म्हणजे रोम जळत असतांना देखील हार्प वाजवत आपला अहंकार कुरवाळणाऱ्या नीरोसमानच झाली ना ही वागणूक!

ज्याच्या रोमारोमात काव्य भिनलेले आहे, जो जीवनातील प्रत्येक गोष्टीत केवळ सौंदर्य शोधण्याच्याच वेडाने पछाडलेला आहे, तो असला उद्धटपणा कधीच करत नाही. आरती प्रभू किंवा जी. ए. कुलकर्णी यांच्यासारखा कायम प्रसिद्धी परान्मुख राहून तो जीवनभर काव्याच शोधात राहतो, स्वतः तर जीवनाचे सौंदर्य उपभोगत राहतोच, शिवाय समाजालाही त्यात्याच्या नकळत  त्यासाठी उद्युक्त करत राहतो.

अर्थातच, काव्य मूलतः व्यक्तिमत्व घडवित असते. ललित काव्यातील चपखल शब्द शोधण्याची वृत्ती, चित्रासाठी योग्य ते रंग निवडण्याची वृत्ती किंवा संगीतात अचूक स्वराची कांस धरण्याची वृत्ती मनुष्याला दैनंदिन जीवनातही तसेच शिस्तबद्ध जगायला उद्युक्त करते. आपल्या मनातील विचार जसेच्या तसे इतरांच्या मनात उतरवण्याची संभाषण कला मनुष्याच्या अंगात भिनते ती काव्यामुळे! अन आपले बोलणे आकर्षक करण्याची कला साधते ती देखील काव्यामुळे!

काव्य हा मूलतः मानवी मनाचा स्थायीभाव आहे. त्याला अनुसरून जगलेले जीवन आनंददायी व सुंदर असेल अन्यथा ते जगणाऱ्यासाठी एक ओझेच ठरेल!

 

 

डॉ. निशिकांत श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.